Shetkari Mitra Bharti 2026: कृषी विभागात 11,587 ‘शेतकरी मित्र’ पदांसाठी भरती

Shetkari Mitra Bharti 2026: कृषी विभागात 11,587 ‘शेतकरी मित्र’ पदांसाठी भरती
Publisher: mahaenokari.com | Date: 2026-08-20
(Note : नोकरीच्या माहिती मध्ये काही चूक आढळल्यास ९४०४५०८४१२ या व्हाट्सअँप क्रमांकावर संपर्क करा)
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत 'आत्मा' (Agricultural Technology Management Agency – ATMA) योजनेद्वारे राज्यातील शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील समन्वय साधण्यासाठी 'शेतकरी मित्र' पदाची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गावपातळीवर आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांचा प्रचार करणे हा आहे. सन 2026-27 या वर्षासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 11,587 शेतकरी मित्रांची निवड करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केले आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मानधन स्वरूपात दरमहा ₹1,500 म्हणजेच वर्षाला ₹18,000 दिले जाणार आहेत. ही भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने ग्राम कृषी विकास समितीमार्फत राबविली जाणार आहे. कृषी क्षेत्रात रस असलेल्या आणि प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. उमेदवारांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे. निवडीनंतर उमेदवारांना प्रशिक्षण देऊन कृषी विभागाचे ओळखपत्र प्रदान केले जाईल. अधिक माहितीसाठी खालील लेख वाचावा.
Shetkari Mitra Recruitment 2026 जागांसाठी भरती 2026 ची थोडक्यात माहिती
| संस्थेचे नाव | कृषी विभाग (आत्मा योजना) |
| पोस्टचे नाव | शेतकरी मित्र |
| पदांची संख्या | 11,587 |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहे |
| अर्जाची शेवटची तारीख | 2026-08-05 |
| अर्जाची पद्धत | ऑफलाईन (अर्ज सादर करणे) |
| श्रेणी | सरकारी नोकरी |
| नोकरीचे स्थान | महाराष्ट्र |
| निवड प्रक्रिया | गुणवत्ता व मुलाखत |
| शिक्षण | 12वी उत्तीर्ण |
| अधिकृत वेबसाइट | atma.gov.in |
Shetkari Mitra Recruitment | रिक्त पदे 2026 तपशील
या भरती मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांत एकूण 11,587 शेतकरी मित्रांची निवड केली जाणार आहे. यामध्ये महिलांसाठी 30% आरक्षण ठेवण्यात आले असून, पारदर्शकतेसाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.
जिल्हानिहाय शेतकरी मित्र निवडीचे लक्ष्य
| अ.क्र. | विभाग | जिल्हा | शेतकरी मित्र लक्ष्य |
|---|---|---|---|
| 1 | ठाणे विभाग | ठाणे | 123 |
| 2 | ठाणे विभाग | पालघर | 198 |
| 3 | ठाणे विभाग | रायगड | 311 |
| 4 | ठाणे विभाग | रत्नागिरी | 363 |
| 5 | ठाणे विभाग | सिंधुदुर्ग | 249 |
| ठाणे विभाग एकूण | 1,244 | ||
| 6 | नाशिक विभाग | नाशिक | 546 |
| 7 | नाशिक विभाग | धुळे | 210 |
| 8 | नाशिक विभाग | नंदुरबार | 243 |
| 9 | नाशिक विभाग | जळगाव | 495 |
| नाशिक विभाग एकूण | 1,494 | ||
| 10 | पुणे विभाग | अहिल्यानगर | 629 |
| 11 | पुणे विभाग | पुणे | 614 |
| 12 | पुणे विभाग | सोलापूर | 536 |
| पुणे विभाग एकूण | 1,779 | ||
| 13 | कोल्हापूर विभाग | सातारा | 475 |
| 14 | कोल्हापूर विभाग | सांगली | 362 |
| 15 | कोल्हापूर विभाग | कोल्हापूर | 374 |
| कोल्हापूर विभाग एकूण | 1,211 | ||
| 16 | छत्रपती संभाजीनगर विभाग | छत्रपती संभाजीनगर | 368 |
| 17 | छत्रपती संभाजीनगर विभाग | जालना | 334 |
| 18 | छत्रपती संभाजीनगर विभाग | बीड | 423 |
| छत्रपती संभाजीनगर विभाग एकूण | 1,125 | ||
| 19 | लातूर विभाग | लातूर | 297 |
| 20 | लातूर विभाग | धाराशिव | 287 |
| 21 | लातूर विभाग | नांदेड | 408 |
| 22 | लातूर विभाग | परभणी | 295 |
| 23 | लातूर विभाग | हिंगोली | 181 |
| लातूर विभाग एकूण | 1,468 | ||
| 24 | अमरावती विभाग | बुलढाणा | 408 |
| 25 | अमरावती विभाग | अकोला | 250 |
| 26 | अमरावती विभाग | वाशिम | 206 |
| 27 | अमरावती विभाग | अमरावती | 447 |
| 28 | अमरावती विभाग | यवतमाळ | 461 |
| अमरावती विभाग एकूण | 1,772 | ||
| 29 | नागपूर विभाग | वर्धा | 235 |
| 30 | नागपूर विभाग | नागपूर | 369 |
| 31 | नागपूर विभाग | भंडारा | 164 |
| 32 | नागपूर विभाग | गोंदिया | 173 |
| 33 | नागपूर विभाग | चंद्रपूर | 346 |
| 34 | नागपूर विभाग | गडचिरोली | 207 |
| नागपूर विभाग एकूण | 1,494 | ||
| महाराष्ट्र एकूण | 11,587 | ||
महत्त्वाचे मुद्दे एकाच नजरेत
| योजना | आत्मा योजना |
|---|---|
| पद/भूमिका | शेतकरी मित्र |
| सन | 2026-27 |
| एकूण लक्ष्य | 11,587 |
| किमान वय | 25 वर्षे |
| कमाल वय | 60 वर्षे |
| शैक्षणिक पात्रता | किमान 12वी उत्तीर्ण |
| महिलांसाठी सहभाग | 30 टक्के अनिवार्य |
| दैनिक काम | किमान 2 तास |
| निवड कालावधी | 2 वर्षे |
| मानधन | ₹1,500 प्रति महिना |
| वार्षिक मानधन | ₹18,000 |
| वार्षिक मूल्यांकन | 125 गुण |
| पुढील वर्षासाठी आवश्यक गुण | किमान 75 |
| महाराष्ट्रातील एकूण लक्ष्य | 11,587 |
Shetkari Mitra Recruitment | शैक्षणिक पात्रता
उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सोशल मीडिया हाताळण्याचे प्राथमिक कौशल्य असणे गरजेचे आहे.
Shetkari Mitra Recruitment | वयोमर्यादा
उमेदवाराचे वय किमान 25 वर्षे आणि कमाल 60 वर्षे असणे अनिवार्य आहे.
Shetkari Mitra Recruitment | पगार तपशील
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹1,500 मानधन दिले जाईल (वार्षिक ₹18,000).
Shetkari Mitra Recruitment | निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाईल. अर्ज ग्राम कृषी विकास समितीकडे सादर करावे लागतील.
महाराष्ट्र शासन
कृषि विभाग,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
Email ID : desk-3a.agri@mah.gov.in
क्रमांकः संकीर्ण-२०२६/प्र.क्र ६०/३
दिनांक: १७ ऑगस्ट, २०२६
प्रति,
आयुक्त (कृषि),
कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,
शिवाजीनगर, पुणे - ४११ ०प्र.
महोदय,
विषयः- आत्मा योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात 'शेतकरी मित्र' निवडीबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांना मान्यता देण्याबाबत.
संदर्भ :-
१. आपले पत्र दिनांक १२.०५.२०२६ यांचे पत्र जा.क्र/आत्मा/शेतकरी मित्र/सु.गा.सु/
२. संचालक (आत्मा), कृषि आयुक्तालय, पुणे यांचे पत्र ५००/२०२६, दिनांक १९.०५.२०२६
आत्मा योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिमहा रु. १,५००/- याप्रमाणे मानधन तत्त्वावर शेतकरी मित्रांची निवड करावयाची आहे. याबाबत क्षेत्रीय स्तरावर शेतकरी मित्र निवडीबाबत निर्गमित करावयाच्या मार्गदर्शक सूचनेचा मसुदा संदर्भाधीन पत्र क्र. १ अन्वये मान्यतेस्तव सादर करण्यात आला होता.
२. सन २०२६-२७ या वर्षासाठी शेतकरी मित्र निवडीच्या मार्गदर्शक सूचनांबाबत सचिव (कृषि) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८.०५.२०२६ रोजी ऑनलाईन आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत प्राप्त झालेल्या सूचनांनुसार, संचालक (आत्मा), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी संदर्भाधीन पत्र क्र. २ अन्वये मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक सुधारणा करून सुधारित मसुदा सादर केला होता.
३. सदर संदर्भाधीन पत्र क्र. २ अन्वये मिळालेल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये सुधारणा करून सुधारित मसुद्यास मान्यता देण्यात येत आहे. त्याची प्रत सोबत जोडली आहे.
४. तरी, मान्यताप्राप्त सुधारित मार्गदर्शक सूचना क्षेत्रीय स्तरावर निर्गमित करून शेतकरी मित्र निवडीची प्रक्रिया पार पाडण्याकरिता आवश्यक ती पुढील योग्य कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.
सोबतः वरीलप्रमाणे.
आपला
विशाल टेके
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
प्रतः-
१. संचालक (आत्मा), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, शिवाजीनगर, पुणे - ४११ ००५.
२. निवडनस्ती (कार्यासन ३-ओ)
शेतकरी मित्र : मार्गदर्शक सूचना (२०२६-२०२७)
अ) शेतकरी मित्र निवडीचे निकष-
- शेतकरी मित्र आत्मा यंत्रणा, कृषि विभाग आणि गाव पातळीवरील शेतकरी यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा असल्यामुळे अनुभवी आणि प्रयोगशील शेतकरी निवडणे आवश्यक आहे.
- शेतकरी मित्र हा कृषि क्षेत्रामध्ये आवड असणारा, कृषि क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणारा, नविन तंत्रज्ञानाचा स्विकार करणारा, तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी स्वतःहुन वेळ देणारा व कृषि विस्ताराचे कार्य हे स्वकर्तव्य समजुन उत्साहाने करणारा असावा. तसेच तो इतर शेतकऱ्यांना बरोबर सामावून घेऊन कृषि विस्ताराचे कार्य करण्याचा कल असणारा असावा.
- शेतकरी मित्र हा कृषि विस्तार यंत्रणा व शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याने शेतीतील कौशल्य सिध्द केलेले असावे. तसेच इतरांस ते अनुकरणीय असावे.
- ज्या शेतकऱ्यांची शेतकरी मित्र म्हणुन निवड करावयाची आहे त्याने विस्तार कार्यक्रम अंमलबजावणीसाठी स्वंयप्रेरित सेवाभावी वृत्तीने काम करणे आवश्यक राहील.
- शेतकरी मित्राची आवश्यक तिथे कृषि विभागाच्या विविध मोबाईल अॅप आणि MIS portal वर माहिती भरण्याची तयारी असणे आवश्यक आहे.
- शेतकरी मित्राकडे गावातील व त्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे उत्तम संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे संघटन करण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे कार्यक्षेत्रातील शेतकरी, कृषि विभाग यांच्याशी समन्वय साधून काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे.
- शेतकरी मित्राने सातत्याने तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM) यांच्याशी संपर्कात राहणे व दिलेली कामे पूर्ण करणे आवश्यक राहील.
आ) किमान पात्रता निकष
- शेतकरी मित्राचे वय किमान २५ व कमाल ६० वर्ष असावे.
- शेतकरी मित्र हा संबंधित सहायक कृषि अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील गावातील रहिवासी व शेतकरी असावा.
- त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसावा.
- शेतकरी मित्राचे शिक्षण किमान १२वी पास असणे आवश्यक आहे.
- किमान कौशल्य पात्रता- शेतकरी मित्राकडे समाज माध्यम हाताळण्याचे किमान कौशल्य असणे आवश्यक आहे.
- शेतकरी मित्रांनी दिवसातून किमान २ तास कृषि विभागाचे काम करणे आवश्यक राहील.
- शेतकरी मित्राचा दृष्टिकोन शेतकरी मित्राचे मिळणारे मानधन हे त्याचे उपजीविकेचे साधन म्हणून पाहण्याचा नसावा. "शेती" हा शेतकरी मित्राचा दुय्यम व्यवसाय नसावा.
इ) शेतकरी मित्राच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या -
शेतकरी मित्रांनी त्यांचे कार्यक्षेत्रात स्वंयप्रेरित सेवाभावी वृत्तीने काम करणे अपेक्षित आहे. शेतकरी मित्रांची प्रमुख कार्य खालीलप्रमाणे असतील:
- आत्मा योजनेतर्गत गावामध्ये महिला/पुरुष शेतकरी गट (FIG), पीकनिहाय शेतकरी गट (CIG) व महिला अन्न सुरक्षा गट (FSG) तयार करून त्यांची क्षमता बांधणी/गटांचे मूल्यमापन/सर्वेक्षण करण्यास सहाय्य करणे.
- नैसर्गिक शेती व आत्मा योजनेतर्गत शेतीशाळेस लाभार्थी निवड करणे, शेतीशाळा राबविण्याकरिता सहाय्य करणे व शेतीशाळेच्या सर्व वर्गाना उपस्थित राहणे.
- ग्रामसभेमध्ये सहभाग घेऊन कृषि व कृषि संलग्न विभागांच्या योजनाची माहिती देणे.
- नैसर्गिक शेती योजनेची प्रत्येक गावामध्ये प्रचार प्रसिद्धी करणे. तसेच प्रसार माध्यमाच्या मदतीने कृषि तंत्रज्ञान व माहितीचा प्रसार करणे.
- तालुका कृषि अधिकारी यांनी वेळोवेळी बोलावलेल्या बैठकीस उपस्थित राहणे.
- आत्मा अंतर्गत प्रात्यक्षिकाच्या तुलनात्मक नोंदी ठेवणे.
- गावामध्ये आयोजित शेतकरी प्रशिक्षणासाठी पुर्वतयारी व यशस्वी आयोजनाकरिता सहाय्य करणे.
- कृषि विभागाच्या विविध योजना, मोहिमा, डिजिटल शेतीशाळा व इतर कार्यक्रम इ. बाबत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM) यांच्या सूचनेप्रमाणे उचित प्रचार व प्रसिद्धी करणे व आयोजनास सहाय्य करणे.
- तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीने निश्चित केल्यानुसार कृषि तंत्रज्ञान प्रसार व प्रसाराप्रीत्यर्थ नेमून दिलेले कामकाज पार पाडणे.
- शेतकरी मित्राने त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करणे आवश्यक राहील.
ई) शेतकरी मित्र निवड प्रक्रिया-
- तालुक्यामध्ये निवड करावयाच्या एकूण शेतकरी मित्रांपैकी ३० टक्के महिलांची निवड करणे अनिवार्य राहील. महिलांचा हा ३० टक्के सहभाग निश्चित करण्याच्या उद्देशाने, तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यातील एकूण गावांपैकी ३० टक्के गावे 'लॉटरी पद्धतीने' केवळ महिलांसाठी राखीव करावीत. तसेच, या निश्चित केलेल्या गावांबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठी संबंधित सहायक कृषी अधिकारी यांना योग्य त्या लेखी सूचना द्याव्यात.
- शेतकरी मित्र निवड करताना सहायक कृषि अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकरी मित्र निवडण्याबाबत ग्रामपंचायतचे सूचना फलक व इतर माध्यमातून प्रसिद्धी करावी. प्रसिद्धी करताना शेतकरी मित्रांच्या सेवा या मानधनतत्वावरील असून त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कृषि विभागामध्ये कायम करण्याबाबत दावा करता येणार नाही. याबाबत स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.
- संबंधित सहायक कृषि अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील गावातील इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सहायक कृषि अधिकाऱ्यांच्या मुख्यालयाच्या ग्राम कृषि विकास समितीकडे सादर करावेत. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ९ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 'ग्राम कृषि विकास समिती' (GKVS) स्थापन करण्याची सूचना दिल्या आहेत. तथापि ज्या गावांनी ग्राम कृषि विकास समिती स्थापन केली नाही त्यांनी तात्काळ स्थापन करून शेतकरी मित्र निवडीची कार्यवाही करावी.
- निवडीचे निकष "उपलब्ध अर्जामधून खालील क्रमाने सर्वात जास्त शिक्षण असलेल्या उमेदवाराची निवड करावी.":
१. पदव्युत्तर
२. पदवीधारक
३. पदविकाधारक
४. बारावी उत्तीर्ण
दोन किंवा अधिक उमेदवारांची सर्वोच्च शैक्षणिक अर्हता समान असल्यास, त्या शैक्षणिक अर्हतेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या उमेदवाराची निवड करणे अनिवार्य राहील. तथापि, जर दोन किंवा अधिक उमेदवार पदव्युत्तर पदवी पेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता धारण करत असतील, तर अशा वेळी त्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या परीक्षेतील गुणांचा विचार करून, ज्या उमेदवारास सर्वाधिक गुण असतील त्याची निवड करावी. - ग्राम कृषि विकास समितीने शेतकरी मित्र निवडीचे निकषानुसार प्राप्त अर्जाची छाननी करावी.
- शेतकरी मित्र निवडीचे निकषानुसार संबंधित सहायक कृषि अधिकाऱ्यांच्या मुख्यालयाच्या गावातील ग्राम कृषि विकास समितीच्या ठरावाने सर्वानुमते शेतकरी मित्राची निवड अंतिम करावी. ग्राम कृषि विकास समितीने या ठरवाची प्रत सहायक कृषि अधिकारी यांना द्यावी. ग्राम कृषि विकास समितीने शेतकरी मित्रांच्या निवडीची संपूर्ण माहिती लगतच्या पुढील ग्रामसभेस ठेवावी. तसेच, शेतकरी मित्र निवडीसाठी प्राप्त झालेले अर्ज, तयार करण्यात आलेली गुणवत्ता यादी तसेच निवडीसाठी निश्चित केलेले निकष ग्रामपंचायतीच्या सूचना फलकवर प्रसिद्ध करून निवड प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी.
- तालुक्यामध्ये प्रत्येक मंजूर सहायक कृषि अधिकारी पदासाठी एक शेतकरी मित्र याप्रमाणे शेतकरी मित्रांची निवड करावी. शेतकरी मित्राची निवड दोन वर्षांच्या कालावधीकरिता करण्यात येईल. ही निवड आत्मा योजनेंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीच्या अधीन राहून करण्यात येत असून सदर निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकरणास राहतील.
- सहायक कृषि अधिकारी यांचे कार्यक्षेत्र हेच शेतकरी मित्राचे कार्यक्षेत्र राहील. परंतु ज्या क्षेत्रामध्ये शहरीकरण झालेले आहे आणि लागवडीलायक कृषि क्षेत्र कमी आहे अशा ठिकाणी शेतकरी मित्र निवडण्यात येऊ नये.
- एकदा शेतकरी मित्र म्हणून निवड झालेली असल्यास पुन्हा त्यांना शेतकरी मित्र म्हणून निवडता येणार नाही.
- शेतकरी मित्र हा कार्यक्षेत्रातीलच असणे अनिवार्य आहे.
- शेतकरी मित्र निवड अंतिम झाल्यानंतर त्यांना रुजू करून घेण्यापूर्वी त्यांच्याकडून सोबत दिलेल्या प्रपत्र ५ मध्ये शेतकरी मित्राकडून बंधपत्र लिहून घेणे आवश्यक राहील.
उ) शेतकरी मित्र क्षमता विकास-
- शेतकरी मित्रांची निवड झाल्यानंतर तालुकास्तरावर किंवा जिल्हास्तरावर सर्व शेतकरी मित्रांचे प्रशिक्षण आयोजित करावे. या प्रशिक्षणामध्ये शेतकरी मित्रांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या यांच्याबद्दल त्यांना माहिती द्यावी.
- शेतकरी मित्रांच्या ज्ञानात भर पडावी याकरिता आवश्यकता असल्यास शेतकरी मित्रांच्या कृषि विज्ञान केंद्र, कृषि विद्यापीठ, कृषि संशोधन केंद्र या ठिकाणी प्रक्षेत्र भेटी आयोजित कराव्यात तसेच सहलींचे आयोजन करावे. याचा खर्च आत्मा योजनेच्या कॅफिटेरियामधून करण्यात यावा.
- कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध मोहिमा, डिजिटल शेतीशाळा यांच्या संकल्पनांची शेतकरी मित्रांना माहिती व्हावी, याकरिता वेळोवेळी शेतकरी मित्रांच्या ऑनलाइन किंवा ऑफलाईन सभा घेऊन त्यांना प्रशिक्षित करावे.
- शेतकरी मित्रांना कृषि विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत शेतकरी मित्र म्हणून कार्यरत असल्याबाबत तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत ओळखपत्र देण्यात यावे.
- शेतकरी मित्रांचा कार्यकाळ संपल्यानंतर शेतकरी मित्रांनी हे ओळखपत्र तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक राहील.
ऊ) शेतकरी मित्रांचे कामाचे मूल्यमापन-
- शेतकरी मित्रांची निवड ही दोन वर्षाच्या कालावधीकरिता करण्यात येईल. परंतु शेतकरी मित्रांचा पहिल्या एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रपत्र २ मध्ये शेतकरी मित्रांनी त्यांचा वार्षिक स्वयं मूल्यमापन अहवाल सहायक कृषि अधिकारी यांच्या प्रमाणपत्रासह तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.
- प्रपत्र २ मधील भाग अ (तांत्रिक बाबींचे मूल्यांकन- एकूण १०० गुण) मध्ये लक्षांक (स्तंभ क्र.३) निर्धारित करताना खालील प्रमाणे सूचनांचा अवलंब करावा:
- शेतीशाळा वर्गास उपस्थिती- शेतकरी मित्राच्या कार्यक्षेत्रामध्ये जितकी गावे आहेत त्या गावामध्ये जेवढ्या शेतीशाळा होतात त्या शेतीशाळेच्या वर्गास उपस्थिती संख्या नमूद करणे.
- गटांची संख्या- शेतकरी मित्राच्या कार्यक्षेत्रामध्ये जितकी गावे आहेत त्या गावात आत्मा अंतर्गत गट नोंदणी करणाऱ्याबाबतचे लक्षांक व साध्य नमूद करणे.
- गट सर्वेक्षण संख्या- शेतकरी मित्राच्या कार्यक्षेत्रामध्ये जितकी गावे आहेत त्या गावात आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गट स्थापन झालेल्या गटापैकी सर्वेक्षण झालेल्या गटांची संख्या नमूद करणे.
- ग्रामसभा- आर्थिक वर्षात शेतकरी मित्राच्या कार्यक्षेत्रामध्ये जितकी गावे आहेत त्या गावातील ग्रामसभेस उपस्थिती सभा संख्या नमूद करणे.
- लक्षांक आणि साध्य याच्या आधारे त्या घटकाची टक्केवारी काढण्यात यावी. प्राप्त टक्केवारीनुसार खाली दिलेल्या तक्त्यानुसार गुणांकन निश्चित करण्यात यावे:
०-२५ टक्के -> १० गुण
२६-५० टक्के -> २० गुण
५१-६० टक्के -> ३० गुण
६१-७० टक्के -> ४० गुण
७१-८० टक्के -> ६० गुण
८१-९० टक्के -> ८० गुण
९१-१०० टक्के -> १०० गुण - प्रपत्र २ मधील भाग ब (एकूण २५ गुण) हा शेतकरी मित्राने त्या वर्षभरामध्ये केलेल्या नाविन्यपूर्ण / उल्लेखनीय बाबींचे मूल्यांकन असेल. यामध्ये वर्षभरात शेतकरी मित्रांनी केलेल्या नाविन्यपूर्ण/उल्लेखनीय बाबींचा थोडक्यात तपशील लिहावा. मात्र याबाबतचा सविस्तर अहवाल ज्यामध्ये नावीन्यपूर्ण बाब/उल्लेखनीय कार्य यासाठी शेतकरी मित्रा केलेले विशेष प्रयत्न, झालेला बदल आणि शेतकऱ्यांना झालेला फायदा याबाबतची आकडेवारी, फोटोग्राफ्स, व्हिडिओ यांचा समावेश असेल तो प्रपत्र २ सोबत जोडणे बंधनकारक राहील.
- प्राप्त झालेल्या स्वयंमूल्यमापन अहवालाचे प्रतिवेदन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी तर पुनर्विलोकन तालुका कृषि अधिकारी यांनी शेतकरी मित्राच्या वर्षभराच्या प्रगतीच्या आधारे प्रपत्र ३ मध्ये अंतिम करावे.
- भाग अ आणि भाग ब यांचे एकत्रित गुण (एकूण १२५ गुणांपैकी) हे त्या शेतकरी मित्राचे वार्षिक गुणांकन राहील.
- तालुका कृषि अधिकारी यांनी अंतिम केलेल्या मूल्यमापनाच्या आधारे ज्या शेतकरी मित्रांना ७५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळतील त्याच शेतकरी मित्रांच्या सेवा पुढील १ वर्षाकरिता सुरू राहतील.
- शेतकरी मित्राची प्रथम नियुक्ती ही पहिल्या एक वर्षाकरिता लागू असेल. शेतकरी मित्राच्या वार्षिक मूल्यमापनामधील प्राप्त गुणांच्या आधारे त्यांच्या सेवा पुढील वर्षाकरिता चालू ठेवायच्या किंवा नाही याचा निर्णय तालुका कृषि अधिकारी यांनी अंतिम केलेल्या मूल्यमापनाच्या आधारे ग्राम कृषि विकास समितीच्या ठरावानुसार घ्यावा. ज्या शेतकरी मित्रांच्या सेवा खंडित होतील त्यांच्या जागी नव्याने शेतकरी मित्राची निवड करण्यात यावी.
- जर कोणताही शेतकरी मित्र नादार घोषित झाला, गैरवर्तणूक करताना आढळला, किंवा त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाल्याचे निदर्शनास आले, तर ग्राम कृषि विकास समितीच्या ठरावानुसार त्याला तातडीने पदावरून काढून टाकण्यात यावे.
- शेतकरी मित्रांना कोणत्याही परिस्थितीत कृषि विभागामध्ये कायम करणेबाबत दावा करता येणार नाही.
- प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यामध्ये त्या अगोदरच्या आर्थिक वर्षांमध्ये शेतकरी मित्राकडून प्राप्त उल्लेखनीय कामगिरी अहवालाच्या आधारे तालुका कृषि अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये केलेल्या नाविन्यपूर्ण बाबी उल्लेखनीय कार्याबाबतचा अहवाल प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालयास सादर करावा.
- याच पद्धतीने प्रकल्प संचालक, आत्मा यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये वर्षभरात विविध योजनांचे समायोजन, समन्वय यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जे नाविन्यपूर्ण कार्य झालेले आहे त्याचा अहवाल कृषि आयुक्तालयास सादर करावा.
ए) शेतकरी मित्रांवरील खर्च-
- शेतकरी मित्रांना प्रति महिना १५०० रुपये याप्रमाणे वार्षिक १८०० रुपये एवढे मानधन देय राहील. याव्यतिरिक्त अतिरिक्त कोणताही निधी/मानधन/प्रवास खर्च/इतर भत्ते देय राहणार नाही.
- प्रत्येक तीन महिन्यांनी शेतकरी मित्रांनी त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे सोबत दिलेल्या प्रपत्र १ मध्ये सादर करावा.
- प्रपत्र क्रमांक १ मधील स्तंभ क्रमांक ३ मध्ये ज्या तीन महिन्याच्या कालावधी करता अहवाल मागवला जात आहे त्या तीन महिन्यांमध्ये शेतकरी मित्रांनी कोणकोणती कामे करणे आवश्यक आहे याचे लक्षांक तालुका कृषि अधिकारी यांनी सहायक कृषि अधिकारी यांच्या सहाय्याने निश्चित करून द्यावे.
- शेतकरी मित्रांना निश्चित करून दिलेल्या लक्षांकाच्या आधारे शेतकरी मित्रांनी केलेल्या कामाची माहिती प्रपत्र १ मध्ये भरून हा अहवाल सहायक कृषि अधिकारी यांच्या शिफारसीने तालुका कृषि अधिकारी कार्यालयास सादर करावा.
- सदर अहवाल तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर ATM, BTM आणि तालुका कृषि अधिकारी यांनी अहवाल योग्य असल्याबाबत प्रमाणित करावे व त्या आधारे शेतकरी मित्राच्या मानधनाची अदायगी करावी.
- शेतकरी मित्रांना मानधन अदा करताना तीन महिन्यांचे एकत्रित मानधन वर्षातून चार टप्प्यात अदा करण्यात यावे.
- मानधन SNA स्पर्श प्रणालीचा वापर करून अदा करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखीने मानधन अदा करण्यात येऊ नये.
ऐ) शेतकरी मित्रांच्या कामाचा आढावा-
- शेतकरी मित्रांच्या दर ३ महिन्यांनी बैठका आयोजित कराव्या.
- आढावा बैठकीची २ सत्रात विभागणी करून पहिल्या सत्रात हंगामपूर्व प्रशिक्षण व दुसऱ्या सत्रात त्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात यावा तसेच पुढील ३ महिन्यामध्ये करावयाच्या कामकाजाचे लक्षांक निर्धारित करून घेण्यात यावेत.
ओ) जिल्हानिहाय शेतकरी मित्र निवडीचे लक्षांक प्रपत्र-४ मध्ये जोडण्यात आले आहे.
प्रपत्र १
शेतकरी मित्राने केलेल्या कामाचा तिमाही अहवाल
शेतकरी मित्राचे नाव - [ ]
मुख्यालय - (सहाय्यक कृषि अधिकारी यांचे जे मुख्यालय आहे तेच मुख्यालय शेतकरी मित्राचे राहील)
शेतकरी मित्राच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांची संख्या - [ ]
तालुका - [ ] | जिल्हा - [ ]
अहवाल कालावधी माहे ..... २०.. ते ...... २०..
| अ.क्र. | बाब | निश्चित केलेले लक्षांक | झालेले साध्य | शेरा |
|---|---|---|---|---|
| १ | २ | ३ | ४ | ५ |
शेतकरी मित्राचे नाव व स्वाक्षरी
शेतकरी मित्राने वरीलप्रमाणे सादर केलेली माहिती योग्य असून त्यांचे मानधन अदा करण्यास शिफारस करण्यात येत आहे.
सहाय्यक कृषी अधिकारी
नाव: [ ]
सजा: [ ]
तालुका: [ ]
दिनांक: [ ]
प्रपत्र-२
शेतकरी मित्र यांचे वार्षिक स्वयंमूल्यमापन
रुजू दिनांक: [ ] | मूल्यमापनाचा कालावधी दिनांक: [ ] ते दिनांक: [ ]
मुख्यालय: [ ] | तालुका: [ ]
अ) तांत्रिक बाबींचे मूल्यांकन
| अ.क्र. | तपशील | लक्षांक | साध्य | टक्केवारी (४/३*१००) |
|---|---|---|---|---|
| १ | शेतीशाळा वर्गाचे आयोजन व उपस्थिती | |||
| २ | गट स्थापना (FIG/CIG/FSG) | |||
| ३ | गट सर्वेक्षण | |||
| ४ | ग्रामसभेस उपस्थिती |
टिप- वरील नमूद बाबी व्यतिरिक्त अतिरिक्त लक्षांकाच्या तालुका कृषि अधिकारी यांनी निश्चित कराव्यात.
ब) नाविन्यपूर्ण/उल्लेखनीय बाबींचे मूल्यांकन (२५ गुण)
तपशील: [ ]
शेतकरी मित्र स्वाक्षरी
वरीलप्रमाणे शेतकरी मित्र श्री/श्रीमती ............................................ यांनी केलेले स्वयंमूल्यमापन योग्य असलेबाबत प्रमाणित करण्यात येत आहे.
सहाय्यक कृषी अधिकारी नाव व स्वाक्षरी
सजा: [ ] | तालुका: [ ] | दिनांक: [ ]
प्रपत्र-३
शेतकरी मित्र यांचे वार्षिक मूल्यमापन
| अ.क्र. | तपशील | प्रतिवेदन अधिकारी यांनी दिलेले गुणांकन (BTM) | पुनर्विलोकन अधिकारी यांनी दिलेले गुणांकन (ता.कृ.अ.) |
|---|---|---|---|
| १ | शेतीशाळा वर्गाचे आयोजन व उपस्थिती | ||
| २ | गट स्थापना (FIG/CIG/FSG) | ||
| ३ | गट सर्वेक्षण | ||
| ४ | ग्रामसभेस उपस्थिती | ||
| ५ | "अ" एकूण गुण / गुणांक | ||
| ६ | "अ" सरासरी गुणांकन (एकूण १०० गुणांपैकी) | ||
| ७ | ब) नाविन्यपूर्ण/उल्लेखनीय बाबींचे गुणांकन (२५ गुणांपैकी) | ||
| ८ | एकूण अंतिम गुणांकन = अ सरासरी गुणांकन + ब गुणांकन |
टिप- प्रपत्र २ मध्ये शेतकरी मित्रांनी भरलेली माहिती योग्य असल्याबाबत पडताळणी करून मार्गदर्शक सूचनेनुसार गुणांकन निश्चित करण्यात यावे.
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (नाव व स्वाक्षरी): [ ]
तालुका कृषी अधिकारी (नाव व स्वाक्षरी): [ ]
प्रपत्र-४
आत्मा योजनेतर्गत जिल्हानिहाय शेतकरी मित्र निवडीचा तपशील
| अ.क्र. | जिल्हा | लक्षांक |
|---|---|---|
| १ | ठाणे | १२३ |
| २ | पालघर | १९८ |
| ३ | रायगड | ३११ |
| ४ | रत्नागिरी | ३६३ |
| ५ | सिंधुदुर्ग | २४९ |
| ठाणे विभाग एकूण | १२४४ | |
| ६ | नाशिक | ५४६ |
| ७ | धुळे | २१० |
| ८ | नंदुरबार | २४३ |
| ९ | जळगाव | ४९५ |
| नाशिक विभाग एकूण | १४९४ | |
| १० | अहिल्यानगर | ६२९ |
| ११ | पुणे | ६१४ |
| १२ | सोलापुर | ५३६ |
| पुणे विभाग एकूण | १७७९ | |
| अ.क्र. | जिल्हा | लक्षांक |
|---|---|---|
| १३ | सातारा | ४७५ |
| १४ | सांगली | ३६२ |
| १५ | कोल्हापुर | ३७४ |
| कोल्हापूर विभाग एकूण | १२११ | |
| १६ | छ. संभाजीनगर | ३६८ |
| १७ | जालना | ३३४ |
| १८ | बीड | ४२३ |
| छ. संभाजीनगर विभाग एकूण | ११२५ | |
| १९ | लातुर | २९७ |
| २० | धाराशिव | २८७ |
| २१ | नांदेड | ४०८ |
| २२ | परभणी | २९५ |
| २३ | हिंगोली | १८१ |
| लातूर विभाग एकूण | १४६८ | |
| २४ | बुलढाणा | ४०८ |
| २५ | अकोला | २५० |
| २६ | वाशिम | २०६ |
| २७ | अमरावती | ४४७ |
| २८ | यवतमाळ | ४६१ |
| अमरावती विभाग एकूण | १७७२ | |
| अ.क्र. | जिल्हा | लक्षांक |
|---|---|---|
| २९ | वर्धा | २३५ |
| ३० | नागपुर | ३६९ |
| ३१ | भंडारा | १६४ |
| ३२ | गोंदीया | १७३ |
| ३३ | चंद्रपुर | ३४६ |
| ३४ | गडचिरोली | २०७ |
| नागपूर विभाग एकूण | १४९४ | |
| महाराष्ट्र एकूण | ११५८७ | |
प्रपत्र ५
शेतकरी मित्र याने द्यावयाचे बंधपत्र
मी स्वयंप्रेरणेने व स्वयंस्फूर्तीने काम करण्यास इच्छुक आहे. मला माझ्या मानधनाव्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त प्रवास भत्ता अथवा इतर देयके मिळणार नाहीत, याची पूर्ण कल्पना आहे व याबाबत माझी कोणतीही हरकत नाही. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार बैठकीस अनुपस्थित राहिल्यास किंवा इतर कोणत्याही कारणामुळे माझी सेवा खंडित झाल्यास, त्यास माझा कोणताही विरोध राहणार नाही. तसेच, माझी सेवा नियमित करण्याबाबत मी कोणताही दावा करणार नाही.
शेतकरी मित्र स्वाक्षरी
नाव: [ ]
गाव: [ ]
Shetkari Mitra Recruitment | अधिसूचना 2024 साठी अर्ज कसा करावा?
1. अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
2. अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे जमा करा.
3. आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा.
| जाहिरात (PDF) | Click Here Full Info PDF |
| अधिकृत वेबसाईट | Click Here |
| अर्ज करण्यासाठी लिंक |
अर्ज ग्राम कृषी विकास समितीकडे सादर करावे लागतील. |
"अशाच नवीन नोकरी जाहिराती मिळवण्यासाठी mahaenokari.com या आमच्या संकेत स्थळावर रोज यायला विसरू नये."
| YouTube | Telegram |
सूचना /Note :- वरील सर्व माहिती त्या -त्या कार्यालयच्या अधिकृत संकेत स्थळावरून घेतलेली आहे .त्यामुळे कुठल्याही कार्यालयामार्फत कुठलीही फसवणूक झाल्यास त्यास महा ई नोकरी डॉट कॉम जबाबदार राहणार नाही .तसेच आम्ही माहिती लवकरात लवकर पोचवण्याच्या हेतूने व सर्वात आधी माहिती देण्याच्या हेतूने पटापट माहिती बनवत असतो त्यामुळे कधी कधी टायपिंग मिस्टेक होऊन अपना पर्यंत चुकीची माहिती येण्याची स्थिती निर्माण होऊ शकत अश्या वेळी आपण अधिकृत जाहिरात अवश्य वाचावी व आमची चूक विसरू आम्हाला लक्षात आणून द्यायला विसरू नये हि विनंती.
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.